डायलिसिस म्हणजे नेमके काय?
रुग्णांना त्याच्या मूत्रपिंडाच्या आजारातील शेवटच्या टप्प्यात डायलिसिस या उपचार पद्धतीची मदत घ्यावी लागते.
किडनीमधील आजारात रुग्णाची मूत्रपिंडे किती कार्यक्षम आहेत यावरुन डॉक्टर त्यांना डायलिसिस करण्याचा सल्ला देतात.यासाठी सर्वप्रथम रुग्णाची सिरम क्रिएटीनाइन ची पातळी तपासण्यात येते.जर रुग्णाच्या किडनीची कार्यक्षमता नेहमीपेक्षा १० ते १५ टकक्यांनी कमी झाली तर रुग्णाला डायलिसिस करण्याचा सल्ला दिला जातो.
अशा वेळी रुग्णांमध्ये ब-याचदा रक्तप्रवाहातील टाकाऊ पदार्थांचा योग्य निचरा न झाल्याने थकवा,एकाग्रता कमी होणे,भूक न लागणे,मळमळ,उलटया,त्वचेला खाज येणे,हात पाय दुखणे,स्थायुंना दुखणे किंवा क्रॅम्प येण्यासारखी लक्षणे दिसू लागतात.ज्याला युरेमिया असेही म्हणतात.
रुग्णाचे डायलिसिस केव्हा करावे लागते?
रुग्णाचे मूत्रंपिड पुर्णत: निकामी झाल्यास त्याच्याकडे डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो.मात्र आणखी अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे रुग्णाला डायलिसिस करावे लागते.
१. शरीरातील द्रव्यपदार्थांचे प्रमाण वाढल्यास -
किडनीचे बिघडल्यास शरीरात गरजेपेक्षा जास्त द्रव्यपदार्थ जमा होतात.यामुळे फुफ्फुसाच्या कार्यावर परिणाम होतो व रुग्णाला श्वास घेणे देखील कठीण होते.
२. शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास-
पोटॅशियम हा शरारातील एक महत्वाचा इलोक्ट्रोलाइट्स आहे. ज्यामुळे किडनीचे कार्य सुरळीत पार पडते.मात्र किडनीचे कार्य बंद पडल्यास शरीरात पोटॅशियम चे रक्तातील प्रमाण वाढू लागते.डायलिसिस प्रक्रिया शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण पुर्ववत करण्यास मदत करते.पोटॅशियमचे प्रमाण वाढल्यास रुग्णाला Cardiac Arrhythmiaसारखा गंभीर त्रास किंवा मृत्यु येण्याचा धोका असतो. जाणून घ्या किडनी विकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका!
३. शरीरातील एसिडचे प्रमाण वाढल्यास-
रक्तप्रवाहातील टाकाऊ पदार्थांचा योग्य निचरा न झाल्याने शरीरात एसिडचे प्रमाण अचानक वाढते.ज्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नाही व डायलिसिस करावे लागते.
डायलिसिस म्हणजे नेमके काय?
डायलिसिस करण्याचे अनेक प्रकार आहेत.मात्र हिमोडायलिसिस आणि पेरिटोनीएल डायलिसिस हे दोन प्रकार सामान्यत: करण्यात येतात.या प्रक्रिया फायदेशीर जरी असल्या तरी त्यामध्ये काही धोके देखील आहेत.
१. हिमोडायलिसिस (Hemodialysis)-
या प्रक्रियेसाठी रुग्णाला हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागते किंवा डायलिसिस मशीन रुग्णाच्या घरी आणावे लागते.दोन्हींमध्ये तज्ञ डॉक्टरच्या देखरेखी खालीच ही प्रक्रिया करणे बंधनकारक असते.या प्रक्रियेत रुग्णाच्या शरीरातील रक्त डायलिसिस मशीनमधील पंपाद्वारे शुद्ध केले जाते व पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडण्यात येते.या संपुर्ण प्रक्रियेला चार तास लागतात व आठवडयातून तीन वेळा ती करावी लागते.
हिमोडायलिसिस प्रकियेमध्ये रक्तप्रवाह वेगाने वाहून नेण्यासाठी रुग्णाच्या मानेत किंवा पायात नळ्या व कॅथटर बसवले जातात.त्यामुळे इनफेक्शनचा धोका अधिक असतो.सध्या आधुनिक तंत्राचा वापर करीत बसवण्यात येणा-या एवीग्राफ्ट(AV graft)किंवा एवीफिस्टूला(AV fistula)मुळे इनफेक्शनचे प्रमाण नियंत्रणात आले आहे.या प्रक्रियेमुळे रुग्णाला थकवा, मळमळ, उलटया, हातापायांमध्ये गोळे येणे, तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे व धडधडणे या समस्यांना सामोरे जावे लागते.
२. पेरीटोनीएल डायलिसिस(Peritoneal Dialysis)-
हा डायलिसिसचा दूसरा प्रकार आहे.यामध्ये डॉक्टर रुग्णाच्या ओटीपोटात छोटीनळी किंवा कॅथटर बसवतात.ज्यातून सोडण्यात येणा-या द्रव्याच्या सहाय्याने रुग्णाच्या रक्तप्रवाहाचे शुद्धीकरण करण्यात येते.शरीरातील द्रव्यपदार्थांचा निचरा करण्यासाठी दररोज चार ते सहा तासांनी ही प्रकिया करावी लागते.रुग्ण त्याच्या घरी किंवा दवाखान्यात ही प्रकिया करु शकतात.मात्र यामध्ये पेरिटोनायटीस(peritonitis) म्हणजेच पोटाच्या आतील भागात इनफेक्शन होण्याचा धोका असतो.तसेच कॅथटर बसवलेल्या ठिकाणी देखील इनफेक्शन होण्याची शक्यता असते.
डायलिसिस प्रक्रिया त्रायदायक जरी असली तरी जर वेळेत उपचार झाले व योग्य ती काळजी घेतली तर डायलिसिस केल्यामुळे रुग्णाला आरोग्य व जीवदान लाभू शकते.